- दूरध्वनी ०२२ २४४६५८७७ / ९२२००७०३८६
- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, २५२, वीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (प), मुंबई - ४०००२८
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धा पारितोषिक वितरण
स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धांतील गुणवंतांचा प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक आणि संजय मोने यांच्या हस्ते गौरवसोहळा संपन्न
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या क्रांतीकारकांचे विचार पोहोचावेत, यासाठी प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील सर्व गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शनिवार, ४ ऑक्टोबर या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक आणि संजय मोने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व गुणवान विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धा झाल्या होत्या. चित्रकला, मातीकाम, परिच्छेद पठण, वीरगीतगायन यांसारख्या विविध १४ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबईतील ३९ शाळांमधील ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रसिद्ध अभिनेते संजय मोने यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल स्मारकाचे सर्वप्रथम अभिनंदन केले. “माझ्या लहानपणी मी अत्यंत बुजरा असल्याने अशा प्रकारच्या कुठल्याच स्पर्धांमध्ये भाग घेतला नव्हता. परंतु आज ज्या प्रकारे ही मुले पुढे होऊन सादरीकरण करत आहेत हे बघून अतिशय आनंद होतोय. या अशा स्पर्धांमुळे या मुलांमध्ये सभाधीटपणा, निरीक्षणशक्ती, आपले विचार मांडायचे धैर्य आणि स्पष्टता हे गुण बाणवले जातील आणि याचा त्यांना पुढील आयुष्यात प्रचंड फायदा होईल. ही नवी पिढी अत्यंत हुशार आहे, ती कशा पद्धतीने व्यक्त होते ऐकायला खूप आवडेल.” अशा प्रकारचे मत संजय मोने यांनी मांडले.
कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याला आपले गुण सिद्ध करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि ते उत्तेजन या स्पर्धांच्यामुळे विद्यार्थ्यांना मिळत आहे, याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो, असे मत अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केले. “या अशा प्रकारच्या स्पर्धा कुणाच्याही प्रगतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. कारण यामुळे त्यांच्याही नकळत एक चांगली स्पर्धा तयार होते. ही स्पर्धाच त्यांना चांगल्या प्रगतीसाठी प्रवृत्त करते. आताचा काळ हा खूप बदलतोय, माणसं अधिकाधिक आत्मकेंद्री होत चाललेली आहेत या काळात आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे राहतो तो देश, करतो ते काम आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रेम करा. हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे, अशा भावना डॉ. गिरीश ओक यांनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमास स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक रणजित सावरकर, स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि या स्पर्धेच्या स्पर्धाप्रकल्प प्रमुख मंजिरी मराठे, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, माजी पोलीस अधिकारी आणि स्मारकाचे विश्वस्त अविनाश धर्माधिकारी, स्मारकाचे विश्वस्त हेमंत तांबट तसेच या स्पर्धांतील सर्व विजेते स्पर्धक आणि त्यांचे पालक उपस्थित होते. साने गुरुजी शाळेच्या क्षितिजा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा झाल्या होत्या. या स्पर्धांसाठी शिल्पा रंजन, सर्नाली पाटील, प्रणाली पवार, श्रध्दा पवार, पूर्वा पेठे या शिक्षिकांनी तसेच स्मारकाचे सहकारी यांनीही योगदान दिले. या स्पर्धांचे हे पहिलेच वर्ष असून आता दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.