स्मारकाविषयी

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची यशोगाथा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही देशातील एक प्रतिथयश शिखर संस्था. अनेक आव्हानांचा सामना करत आज या संस्थेनं आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.

 

  • 'स्वातंत्र्यवीर' हा वॉल मॅपिंग तंत्रज्ञानावर आधारित पहिला व्यक्तिचित्रणात्मक आणि कायमस्वरूपीलाईट अँड साऊंड शो.
  • स्मारकातील सेल्युलर जेल, कोलूची हुबेहुब प्रतिकृती
  • पुरातत्व खात्याच्या दत्तक योजने अंतर्गत भगूरमधील 'सावरकर वाड्या'च्या देखभालीचा मिळालेला सन्मान, त्यानंतर तिथं वाढलेली पर्यटकांची वर्दळ
  • संसदेत अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डॉ. नरेंद्र जाधव, चंद्रशेखर टिळक असे विख्यात अर्थतज्ञ करत असलेलं ‘अर्थसंकल्प विश्लेषण’
  • राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन विद्यापीठात पदार्थ विज्ञान, मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास या विषयासाठी देण्यात येणारे सुवर्णपदक
  • सावरकरांचे कृतीशील अनुयायी श्री. पु. गोखले यांच्यामुळे उपलब्ध झालेली सावरकरांची उर्दू गझल, कविता लिहिलेली वही आणि ‘हम ही हमारे वाली है’ या ध्वनिफितीची निर्मिती
  • डाव्यांच्या गढीत-जेएनयूमध्ये 'हे मृत्युंजय' दोन वेळा सादर करून निनादलेला 'भारतमाता की जय'चा घोष
  • 'हे मृत्युंजय'च्या दुसऱ्या प्रयोगाच्या दोन दिवस आधी तिथल्या एका रस्त्याला दिलं गेलेलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव
  • दिल्ली युनिव्हर्सिटीत सादर झालेल्या 'हे मृत्युंजय' नाटकानंतर तिथं उठलेलं वादळ, ते आता त्या युनिव्हर्सिटीला सावरकरांचं नाव देण्यापर्यंतच्या घडलेल्या प्रवासाचं श्रेय निसंशय स्मारकाच्या ‘हे मृत्युंजय' नाटकाचं, याच नाटकाच्या माध्यमातून अल्पावधीत सावरकरांचे विचार लाखभर मुलांपर्यंत पोहोचवण्यात स्मारकाला आलेलं यश
  • नाशिकच्या कारागृहात अडीच हजार बंदीवानांसमोर सादर झालेला 'हे मृत्युंजय'चा प्रयोग
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्यकर्तृत्वावर उभ्या राहणाऱ्या अनेक संगीतमय कार्यक्रमांसाठी पथदर्शी ठरलेल्या 'शतजन्म शोधितांना' या भव्य दृक्श्राव्य, नृत्यनाट्य संगीतमय कार्यक्रमाचे असंख्य प्रयोग, हिंदीत ‘स्वातंत्र्यवीर’ या कार्यक्रमाची निर्मिती
  • लडाख माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने वीर सावरकर माऊंटेनरिंग इन्स्टिट्यूट ऑफ सर्च अँड रेस्क्यूची स्थापना.
  • २०१८/१९ मध्ये सात तर २०१९/२० या कालखंडात सोळा कारागृहातील बंदीवानांपर्यंत सावरकर साहित्य पोहोचवून घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा,
  • सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ सर करणाऱ्या पहिल्या भारतीय चमूचा सत्कार.
  • रत्नागिरीच्या कारागृहात प्रदर्शन, प्रोजेक्टर, कपाट, खुर्च्यांची करून देण्यात आलेली सोय
  • गेली अकरा वर्ष स्वच्छता, व्यवस्थितपणा, उत्तम सेवेचा नावलौकिक टिकवून असलेलं 'स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह'.

 

स्मारकाच्या गेल्या चौदा पंधरा वर्षातल्या यशस्वी कार्याची छोटीशी झलक.

 

  • १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त ६ मे २००७ ते १० मे २००७ या कालावधीत आयोजित पाच दिवसीय कार्यक्रम.
  • वर्ष २००७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्मिलेल्या ध्वजाच्या शताब्दीनिमित भरगच्च कार्यक्रम.
  • सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या उडीच्या शताब्दीनिमित्त ८ जुलै २०१० मध्ये अकरा जिल्ह्यांचा सहभाग असलेल्या सागरी जलतरण स्पर्धांचं यशस्वी आयोजन.
  • गडकिल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गडकिल्ले चित्र प्रदर्शन, सावरकर श्री, १५ रक्तदान शिबिरं, चित्रकलास्पर्धा, सावरकर दौड (मॅरेथॉन)
  • १५ ऑगस्ट २०२१ ला टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि मुंबई अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या सहयोगानं घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात झालेलं विक्रमी रक्तदान

 

असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गेल्या काही वर्षात यशस्वीरित्या झाले.

 

  • जेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, अनिल काकोडकर तसंच रतन टाटा, नारायण मूर्ती अशा श्रेष्ठांनी स्मारकाला दिलेली भेट, भूतपूर्व पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याशी जुळलेले स्नेहबंध हे सारे आम्ही अनुभवू शकलो ते केवळ सावरकर स्मारकामुळे.
  • कोविडच्या काळात सारं जग ठप्प झालं होतं पण या काळातदेखील स्मारकाचं काम काही थांबलं नाही. याच काळात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज अशा 'सावरकर स्टुडिओ'ची (३६०° क्रोमा आणि ऑडीओ स्टुडिओ) निर्मिती झाली.
  • स्मारकाच्या ध्येय धोरणांनुसारच पण आजच्या काळाशी सुसंगत आणि अत्यंत आवश्यक असलेल्या निष्पक्ष बातम्यांसाठी, हिंदुत्वासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ हे न्यूज पोर्टल आकाराला आलं. त्यासाठी या काळात काही पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी स्मारकात मुक्काम केला, कोविडच्या काळात स्मारकाच्या देखभालीसाठी सुरक्षा रक्षकांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व सोय स्मारकानं केली.
  • कोविडच्या सुरुवातीच्या काळात एका इस्पितळाला पाचशे पीपीई किट्स देण्यात आली, पोलीस आणि पालिकेसाठी दहा हजार मास्क देण्यात आले.
  • कोविडच्या काळात दोन्ही वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती ऑनलाईन साजरी करण्यात आली. त्या निमित्त जाहीर केलेले शौर्य पुरस्कार, विज्ञान पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. सावरकरांचा आत्मार्पणदिन देखील ऑनलाईनच घेण्यात आला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाची अतिशय गौरवास्पद कामगिरी म्हणजे २०१५ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पन्नासाव्या आत्मार्पण दिनानिमित्त हिमाचल प्रदेशातील बातल परिसरातील शिखरावर चढाई करून त्याचं ‘शिखर सावरकर’ असं करण्यात आलेलं नामकरण. त्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या कोविडच्या काळातचं पहिला ‘शिखर सावरकर पुरस्कार’ सोहळा ऑनलाईन आयोजित करण्यात आला. अर्थात निर्बंध थोडेसे शिथिल झाल्यावर हे पुरस्कार प्रदानही करण्यात आले.
  • कोविडच्या काळात स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीनं सुरु झालेल्या व्याख्यानमालेत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी आतापर्यंत १६२ व्याख्यानं दिली. ही व्याख्यान ६,२०,३५७ लोकांपर्यंत पोहोचली, तर ८ मे २०२० ते १९ सप्टेंबर २०२० या कालावधीत झालेल्या ऑनलाईन ‘सावरकर व्याख्यानमाले’त २८ व्याख्यानं आयोजित करण्यात आली. जी २,८४,८६२ लोकांपर्यंत पोहोचली.
  • २ मे २०२१ ते १६ मे २०२१ या कालवधीत वीर सावरकरांच्या अंदमानातील मुक्ततेच्या शताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन कालापानी मुक्ती शताब्दी व्याख्यानमालेत ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रा. कपिल कुमार, मेजर जनरल जी. डी. बक्षी, सूचना आयुक्त उदय माहुरकर, अधिवक्ता अंकुर शर्मा यांची व्याख्यानं झाली. जी ९६,०७७ लोकांपर्यंत पोहोचली. १ ऑक्टोबर २०१९ ते १० नोव्हेंबर २०२१ या कालवधीत स्मारकाचे फेसबुक पेज ४१,६६,३०५ लोकांपर्यंत पोहोचलं आहे.
  • एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं सावरकरांचा अपमान करणारे दोन कार्यक्रम सादर केले. त्यावेळी कुठलीही प्रभावी यंत्रणा नसूनसुद्धा स्मारकानं सोशल मिडीया या अतिशय प्रभावी माध्यमाचा उपयोग करून एबीपी माझा या वृत्तवाहिनीला ‘माफी’ मागण्यास तसंच त्यांनी प्रदर्शित केलेल्या कार्यक्रमाच्या क्लिप्स देखील समाज माध्यमावरून हटवण्यास भाग पाडलं. त्यावेळी याच ‘सावरकरी’ पेजवरून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य मंडळींनी ‘सावरकर’ या नावासाठी, समाज माध्यमावर आम्हाला भरघोस पाठिंबा दिला. आपल्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील याचा त्या वाहिनीनं विचारदेखील केला नसेल पण तसं घडलं. कॉटन किंग यांनी सर्वप्रथम जाहिरात काढून घेतली आणि त्या वाहिनीला पहिला झटका बसला. त्यानंतर सुहाना मसाले, प्रवीण मसाले, पितांबरी अशा अनेकांनी जाहिराती बंद केल्या. त्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि एबीपी माझाच्या संपादकांना स्मारकात येऊन माफी मागण्याचा निर्णय घ्यावा लागला.
  • ‘द विक’ मासिकात छापण्यात आलेल्या सावरकरांची बदनामी करणाऱ्या लेखाविरुद्ध स्मारकानं दिलेल्या न्यायालयीन लढाईलाही यश आलं. त्यांनीदेखील जाहीर क्षमायाचना केली. याशिवाय राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याविरुद्धही न्यायालयीन लढा सुरु आहे.
  • स्मारक न्यायालयीन लढाया लढतच असलं तरीपण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होणाऱ्या दोषारोपांवर काय उत्तरं द्यायची हा अनेकांच्या मनात प्रश्न असतो. त्यासाठीच ‘अ-सत्याचे प्रयोग’ ही पुस्तिका स्मारकाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आली असून ती खूप मोठ्या प्रमाणावर वितरीत करण्यात येते आहे. सावरकरांच्या कार्याविषयी खरोखर आत्मीयता असणाऱ्यांना त्या पुस्तिकेचं महत्वही पटतं आणि त्यामुळेच अनेक संस्थादेखील ती पुस्तिका वितरीत करत आहेत.
  • बेस्ट सेलरचा पुस्तकाचा सन्मान मिळविलेले विक्रम संपत, उदय माहुरकर अशा अनेक लेखकांसाठी योग्य संदर्भ, छायाचित्र मिळण्याचं सावरकर स्मारक हे हक्काचं ठिकाण आहे. देशभर हिंदुत्वाचा प्रचार करणारे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, आर एस एन सिंग यांच्यासारखे अनेक नामवंत स्मारकाशी कायमचे जोडले आहेत.
  • अनेक संस्थांची मंडळी मार्गदर्शनासाठी स्मारकात येतात. देशाच्या अनेक भागातील, विदेशातील प्रतिष्ठित मंडळीदेखील स्मारकाला भेट देतात. स्वातंत्र्यवीरांवर मालिका, चित्रपट निर्मितीची इच्छा असणारे अनेकजण चर्चा करण्यासाठी स्मारकात येत असतात.
  • यूपीएससी, एमपीएससीच्या प्रशिक्षण वर्गाबरोबरच नेमबाजी, धनुर्विद्या, फेन्सिंग, तायक्वांदो असे तीसएक उपक्रम स्मारकात नियमित चालतात. एका छताखाली इतके सारे उपक्रम चालवणारी सावरकर स्मारक ही मुंबईतील एकमेव संस्था असावी. लहान मुलं, तरुणाईचा संध्याकाळचा स्मारकातला वावर हा अतिशय आनंददायी असतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे हिंदुस्थानच्या क्रांतिकारकांचे मुकुटमणि त्याचे शौर्य, प्रखर बुद्धिमता, लिखाण, काव्य, अमोघ वकृत्व आणि सर्वांपेक्षा थोर असा त्यांनी मायभूमीसाठी केलेला अतुलनीय त्याग यामुळे या शतकातील सर्व नेत्यांमधील सावरकरांचे स्थान सर्वोच्च ठरावे.

 

वीर सावरकर यांचे निर्वाण दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी झाले. रत्नागिरीच्या कारागृहातून त्यांची बिनशर्त सुटका झाल्यानंतर दोन दशके ज्या मुंबईत त्यांनी कार्य व वास्तव्य केले त्या मुंबईत त्यांचे यथोचित स्मारक उभारण्याचा निर्णय त्यांच्याबद्दल आदर व श्रद्धा असलेल्यांनी घेतला हे अत्यंत यथोचित होय.

 

माजी खासदार वि.घ. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली वाहण्याकरिता जी सर्वपक्षीय सभा झाली होती तीमध्ये सावरकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ यथोचित स्मारक उभारण्यासंबंधीचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर चार महिन्यांनी प्रतिष्ठित नागरिकांच्या सभेमध्ये समितीची स्थापना करण्यात आली व अशाप्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक अस्तित्वात आले..

या स्मारकाची त्यानंतर सहकारी अधिनियमान्वये व सार्वजनिक विश्वस्त अधिनियमान्वये नोंदणी करण्यात आली. या समितीचे सदस्य त्या वेळेचे रेल्वेमंत्री स. का. पाटील, मध्यप्रदेशचे त्यावेळचे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर, श्री. गोविंदलाल पित्ती, गुलाबचंद हिराचंद व एन. सी. चटर्जी, नित्यनारायण बॅनजी अँड माधवराव पाठक, प्रा. वि. घ. देशपांडे, डॉ. अरविंद गोडबोले, श्री विष्णुपंत पाटील (सोलापूर), वा. ब.गोगटे, शं. रा. दाते, ग. म. नलावडे, ज. श्री. टिळक, पुण्याचे श्री. पु. गोखले, सांगलीचे पंडितराव दांडेकर, विक्रम सावरकर, एकनाथ खानोलकर, पंडित बखले हे होते.

 

सावरकरांच्या निधनानंतर लगेच मुंबई महानगरपालिकेमध्ये समितीच्या वतीने आग्रह धरून कॅडेल रोडचे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग असे नामकरण करण्याचा ठराव मान्य करण्यात आला. हा ठराव अप्पा पेंडसे व पंडित बखले यांनी मांडला व तो एकमताने संमत करण्यात आला.

 

नियोजित स्मारकासाठी योग्य अशी जागा मिळवणे हा मोठा प्रश्न होता. प्रदीर्घ प्रयत्नानंतर मुंबई महापालिकेमध्ये एकमताने स्मारक उभारण्यासाठी एक भूखंड देण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यानंतर स्मारकाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जोपासलेली मूल्ये व राष्ट्रीय संकल्पना यांचा अविष्कार साकारणारे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा पक्का निर्णय केला गेला.

 

दिनांक २६ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईचे तत्कालीन महापौर सुधीर जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील भूखंड समारंभपूर्वक सावरकर स्मारक समितीच्या ताब्यात दिला तत्कालीन आयुक्त म. वा. देसाई व स्थायी समितीचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे उपस्थित होते.

 

स्मारकास जागा हस्तांतरित केल्यानंतर लगेच प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन दिनांक २८ मे १९७५ रोजी त्यावेळच्या गोव्याच्या मुख्यमंत्री सौ. शशिकला काकोडकर यांच्या शुभहस्ते झाले. या स्मारकाकरिता स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर व सौ. शशिकला काकोडकर यांनी खूप लक्ष घातले अलीकडे भाऊसाहेब बांदोडकर यांच्या स्मृत्यर्थ स्थापन केलेल्या दयानंद चॅरिटी ट्रस्टने एक लक्ष रूपये रकमेचा धनादेश स्मारकाकरिता दिला.

 

स्मारकाच्या भूमिपूजनाचा समारंभ त्यावेळचे संरक्षण मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या शुभहस्ते दि. २० मे १९७९ रोजी संपन्न झाला. त्यावेळी बोलताना बाबूजीनी स्वातंत्र्यवीरांनी दलिताच्या उद्धारासाठी केलेले अमोल कार्य व राष्ट्राला क्षात्रतेजाची दिशा देण्यासाठी केलेले अविरत भगिरथ प्रयत्न यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्य मंत्री असलेले शरदराव पवार यांनी अध्यक्षपदावरून भाषण करताना स्मारकाला सदिच्छा दिल्या महाराष्ट्र शासनाचा या स्मारकासाठी पहिला हप्ता म्हणून २.५ लक्ष रुपयाच्या देणगीची घोषणा केली.

 

दिनांक २६ फेब्रुवारी १९८१ रोजी त्या वेळचे मुंबईचे महापौर श्री बाबूराव शेटे यांच्या शुभहस्ते स्मारकाच्या बांधकामाची सुरवात करण्यात आली. महाराष्ट्राचे ऊर्जा सांस्कृतिक व कार्यमंत्री श्री जयंतराव टिळक हे अध्यक्षस्थानी होते.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे सुद्धा सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या बाबतीत रस घेत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्मारकासाठी निधी गोळा करण्याकरिता एक आठवडाभर अभियान सुरू करून निधी गोळा करून दिला होता. त्याकरिता त्यांनी सभाही घेतल्या होत्या अशा प्रकारे गोळा केलेला निधी रा. स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह राजेंद्रसिहजी यानी समारंभपूर्वक दिनांक २६-२-१९८२ रोजी स्मारकाच्या सुपूर्द केला मुंबईचे भूतपूर्व महापौर श्री. प्रभाकर पै यांनी दि. २८ मे १९८२ ला पाया खणण्याचा मुहुर्त केला. १९८३ मध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्यास आली ही जयंती सर्वाधनि साजरी बावी म्हणून स्मारकाच्या वतीने वीर सावरकरांचे जीवन व चरित्राचे पैलू दर्शविणारे अनेक लेख व साहित्य देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

 

स्वर्गीय महामंत्री इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी उत्सवामध्ये मौलिक संदेश पाठवून कार्यास पाठींबा दिला होता. स्मारकाच्या बाबतीत त्यांना अत्यंत आस्था होती.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अगदी सुरवातीपासून स्मारकाला मदत झालेली असून सावरकरांच्या मूर्तीबाबत त्यांचा अनमोल सल्ला व सहाय्य मिळाले.

 

कांग्रेस पक्षाचे नेते दिवगत रजनी पटेल, वसंतदादा पाटील, बाबासाहेब भोसले, सुशीलकुमार शिंदे, मुरली देवरा यांनी स्मारकाच्या कामाला नेहमीच उत्तेजन दिले आहे.

 

भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवानी जनता दलाचे नेते मधू दंडवते, आझाद हिंद सेनेच्या (आय. एन. ए) नेत्या के लक्ष्मी, विख्यात समाजकार्यकर्ते बाबा आमटे, व्हाईस अॅडमिरल मनोहर आवटी, श्री. नरेंद्र तिडके यांनी स्मारकाला भेट देऊन स्मारकाच्या कामाबाबत प्रशंसोउद्गार काढले आहेत.