News : स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम देशाला योग्य वाटचाल करायची असेल तर सावरकरांच्या विचारांचे अनुकरण हवे इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे विचार
देशाला योग्य दिशेने वाटचाल करायची असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रवादाच्या विचारांचे अनुकरण करावेच लागेल, असे ठाम प्रतिपदान इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनाच्या कार्यक्रमात समाज क्रांतिकारक सावरकर या विषयावर बोलताना व्यक्त केले.
प्रभावीपणे राजकीय व सामाजिक क्रांती करणारे स्वातंत्र्यवीर हे वेगळेच क्रांतिकारक होते. समाजाला लागलेल्या अनिष्ट रूढी नष्ट करण्यासाठी तसेच समाज एकसंघ करण्यासाठी त्यांनी केलेली सामाजिक क्रांती विशेष होती. अस्पृश्य नसूनही अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी संघर्ष केला. लेखणीतून विचार मांडत असतानाच त्यांनी त्या विचारांना कृतीची जोड दिली. पतितपावन मंदिराची निर्मिती हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे. कुठलाही धर्मग्रंथ हा विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे स्वीकारणे अशक्य आहे, असे त्यांना ठणकावून सांगितले होते. विज्ञाननिष्ठतेची कास धरण्याचा आग्रह करत लोकांना साक्षर केले. कर्मकांडात अडकू नये, प्रत्येक भूमीप्रमाणे त्या त्या ठिकाणाचा किंवा राष्ट्राचा धर्म असायला हवा, त्यानुसारच वागले पाहिजे, या विचारांवर सातत्याने भर देणारे ते समाज क्रांतिकारक सावरकर होते, असेही त्यांनी सांगितले.
स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी स्वातंत्र्यवीरांचा सर्वदूर पसरविण्याचे कार्य स्मारकाच्या वतीने होत असल्याचा उल्लेख केला. तसेच स्मारकाचे संस्थापक सदस्य विक्रमराव सावरकर यांना आदरांजली अर्पण केली. स्मारकाबद्दल आपुलकी असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून तात्यारावांच्या परवानगीने जयोस्तुते व सागरा प्राण तळमळला ही गीते गावून नंतर ती अजरामर झाल्याच्या आठवणी सांगितल्या. स्मारकात भेट देण्याचा मनोदयदेखील व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच स्मारकाचे पदाधिकारी, सदस्य, सावरकरभक्त व देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.